Friday, 6 July 2012

वारी माझ्या नजरेतून


          या वर्षी फेसबुक करांच्या दिंडीच दुसरं वर्ष होतं , मी मागील वर्षी प्रमाणे "फेसबुक करांची दिंडी " (https://www.facebook.com/events/349630685096756) असा इवेंट बनवला आणि आपल्या मित्रांना आमंत्रित केले , त्यांनीही त्यांच्या मित्रांना आमंत्रित करून हा इवेंट संपूर्ण जगात पोहचावा यासाठी मला मदत केली. मागच्या वर्षीच्या  साध्या मोबाईल फोनची जागा या वर्षी महाराजांच्या कृपाशीर्वादाने मिळालेल्या नोकरीतून घेतलेल्या प्रोफेशनल कॅमेऱ्याने घेतली होती, त्यामुळे या वर्षीचा पालखी सोहळा हाय डेफिनिशन कॅमेऱ्यातून पाहण्याचा आणि तो भाविकांना दाखवण्याचा आनंदच वेगळा होता.


वारीच्या आगदी पहिल्या दिवसापासून मी आणि माझा कॅमेरा दोघेही वारीतील अप्रतिम असे क्षण टिपण्यासाठी सज्ज असायचो , सोबत फोटो अपलोड करण्यासाठी छोटासा संगणक. वारीत सर्वात पुढे  , मग चौघडा गाडी असते  त्यानंतर चालणारे रिंगणातील अश्व, अब्दागिरी वाले,   रथाच्या पुढे चालणाऱ्या ४०-५० दिंड्या , पूर्वी सर्व दिंड्या महाराजांच्या रथाच्या मागेच चालत असत पण आता काही उत्साही दिंड्या पुढे चालतात . मग रथाच्या मागे प्रचंड असा जनसमुदाय , जवळपास २५० दिंड्या , प्रत्येक दिंडीत पताकाधारी , तुळस डोक्यावर घेतलेल्या तुलासिधारी महिला , तसेच काही दिंड्यात डोक्यावर हंडा किवा कळशी घेतलेल्या महिलाही असतात , प्रत्येक दिंडीत दिंडीतील शिस्त राखणारा लाल कपड्यातील एक चोपदार असतो .
महाराजांच्या पालखीचा एक मुख्य चोपदार देखील असतो , पालखी कुठे कधी थांबर , कधी निघणार याच्या सूचना तोच देतो . पालखी रथाला जुपलेल्या बैलांची निवड त्यांच्या डौलदार आणि काटक   क्षमतेवरून केली जाते  , बऱ्याच बुद्धिवाद्यांचा रथाला बैल जोडण्यास आक्षेप आहे परंतु , परंपरा ती  परंपराच .

वारीतील सर्वात सुखद आनंद म्हणजे रिंगण , रिंगणाचे दोन तीन प्रकार आहेत  गोल रिंगण, उभे रिंगण , काटेवाडीत होणारे मेंढ्यांचे  रिंगण अगदी विलक्षण  . रिंगण म्हटले कि सगळ्या वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारतो . गोल रिंगणाच्या वेळी रिंगणात धावण्याची मजा एकदा तरी अनुभवावी .

पुढे तोंडले - भोंडले  येथे होणारा विठ्ठलाचा धावा , तिथून पंढरपूरच्या विठ्ठल  मंदिराचा कळस दिसतो असे म्हणतात , म्हणून सर्वजण पालखी  सोबत जवळपास २-३ किलोमीटर धावतात . "तुका म्हणे धावा | आहे पंढरीत विसावा || ".

वारीत अनेक मित्र भेटले , लहान थोर पण कुणीच कधी आपल्या मोठेपणाचा किवा आपल्या लहान असल्याचा दाखला देत नाही आणि त्याची गरजाही नसते , हि वारी हेच सगळ्याच्या आयुष्याची पुंजी असते .

-जय हरी
स्वप्निल राम मोरे , श्री क्षेत्र देहूगाव .